-ॲड. श्री.भगवान मिरजकर (संगीत उपासक/अभ्यासक)
संगीत हि ईश्वराने मानवास दिलेली सर्वात आनंददायी देण आहे. संगीत कोणतेही असो ते नेहमी आनंदच देत असते. संगीताचे वेगवेगळे प्रकार आणि शाखा आहेत. त्यात शास्तीय संगीत हि एक प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरागत आणि पिढीजात शाखा आहे. इतर संगीताचा उगम हा पुढे हळूहळू होत गेला आणि तो पुढे हळूहळू प्रचंड विकसितहि होत गेला आणि आज सर्व प्रकारच्या संगीताचे एक भव्य आणि दिव्य साजेसे रूप आपल्याला अनुभवायला मिळत आहे. हा आनंद इतर कोणत्याही आनंदाशी तुलनात्मक दृष्ट्या सरसच आहे.
संगीत हि आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे आणि हि जतन आणि संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. संगीत हि एक अशी अनुभूती आहे जेथे आपण प्रत्त्यक्ष ‘संगीतातून समाधीकडे’ या उक्तीचा खराखुरा अनुभव घेऊ शकतो. प्रत्त्येक प्रकारचे संगीत हे एक वेगळी अनुभूती देत असते. आपापल्या आवडी निवडी नुसार संगीत हे त्या त्या व्यक्तीला त्या त्या प्रकारचा सर्वोच्च कोटीचा आणि परमानंद देत असते.
आपण बऱ्याच वेळा असा अनुभव घेतला असेल कि आपले आवडते संगीत ऐकले कि आपल्याला अतिशय आनंद होतो मग ते कोणतेही संगीत असो. एखादी गज़ल असो, भावगीत असो, जुने हिंदी गाणे असो, नाटयगीत असो, भजन असो, किंवा एखादा छोटा किंवा बडा खयाल असो. हे ऐकल्या मुळे आपले मन प्रफुल्लित होते आणि काही कालासाठी आपण एका वेगळ्या जगात वावरत असतो.
मी बऱ्याच वेळा असा अनुभव घेतला आहे कि एखादा आवडता राग किंवा एखादे आवडते गीत ऐकताना माझ्या शरीरामध्ये कळत-नकळत काही तरी सकारात्मक बदल घडून येतात. अंगावर शहारे (रोमांच) येणे हा त्यातलाच एक प्रकार आहे. आपल्या अंगावर शहारे का बरे येत असतील..? असा कोणता बदल या संगीतामुळे आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये होत असेल बरे..? या गोष्टीचा मी नेहमी विचार करत असतो. का आपले मन कधी आनंदी तर कधी गंभीर, कधी उदास तर कधी भक्तिमय, कधी समर्पणाची भावना जागृत होते तर कधी मनामध्ये प्रेम दाटून येते, कधी देशभक्ती उफाळून येते तर कधी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची एक नवी उमेद जागृत होते, कधी नकळत डोळ्यातून अश्रू झरतात तर कधी आनंदाने मन भरून येते, कधी आपल्या अत्यंत जवळच्या माणसाची आठवण होते तर कधी एखाद्या जवळ नसलेल्या व्यक्तीच्या विरहाने मन खिन्न होते, कधी कधी आपण एकटेच हा जीवन प्रवास करतो आहोत अशी एकाकी भावना होते तर कधी कधी सर्व जण आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे आहेत आणि आपल्याला भरभरून प्रेम देत आहेत अशी भावना होते. हे सर्व भाव आले कुठून..? का हे भाव आपल्यामध्ये नव्याने निर्माण झाले असतील..? उत्तर -> ‘नाही’…… हे सर्व भाव आणि भावना आपल्यामध्ये उपजत असतातच फक्त त्याला जागृत करण्याचे आणि त्यांना वाट मोकळी करून देण्याचे काम हे संगीत करत असते. या सर्व गोष्टीचा अनुभव आपण नक्कीच घेतला असेल यात संशय नाही आणि या गोष्टी का घडतात याचा विचारहि आपल्या मनामध्ये अनेकदा आलाही असेल…!
माझे आवडते संगीत कोणते..? असे जर मला कोणी विचारले तर त्याचे नेमके उत्तर मला देता येणार नाही कारण मी सर्व प्रकारचे संगीत ऐकतो. असा एकही संगीत प्रकार नाही जो मी ऐकत नाही. मी शास्त्रीय संगीत, ठुमरी, टप्पा, लोकसंगीत, भजन, गज़ल, लावणी, जुनी हिंदी गाणे, मराठी भावगीते, मराठी गज़ल, नाट्यगीते, असे अनेक प्रकारचे संगीत मी आवडीने ऐकत असतो. एवढेच नव्हे तर बंगाली रबिन्द्रो संगीत, गुजराती लोकसंगीत, उत्तराखंड लोकगीत, जुनी हॉलिवूड इंग्रजी गीते आणि नवीन पण काही नेमकीच निवडक आणि रसाळ हिंदी आणि मराठी गीतेहि मी ऐकत असतो.
माझा सर्वात आवडता संगीत क्रम काही असा आहे:
१. शास्त्रीय संगीत
२. मराठी आणि हिंदी भजन
३. मराठी आणि हिंदी गज़ल
४. जुने हिंदी सिने गीते
५. मराठी भावगीते
६. लावणी, लोकसंगीत व इतर सर्व सर्व संगीत प्रकार
ऐकणे हा एक साधा सरळ आणि अतिशय सोपा मार्ग आहे ज्यामुळे तुम्हाला संगीताच्या वेगवेगळ्या विषयाची ओळख होते तसेच कोणत्या गीत प्रकाराची ठेवण आणि सुरावट कशा प्रकारे रचलेली आहे याची पण जाण तयार होते. आपल्या कडे जसे तानसेन म्हणजे ‘उच्च कोटींचा गाणारा’ असा शब्दप्रयोग करतात तसेच ‘कानसेन’ म्हणजे ऐकण्याची पूर्ण समज असणारा आणि ‘उच्च कोटींचा श्रोता’ असाही शब्दप्रयोग प्रचलित आहे. म्हणून ऐकणे हि गाण्यामध्ये पारंगत होण्याची पहिली पायरी आहे. जो पर्यंत तुम्ही ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला गाता येणार नाही आणि त्या संगीताची एक समज निर्माण होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल किंवा तुम्ही काही काम करत आहात त्यावेळी सोबत लहान आवाजामध्ये तुमचे आवडते संगीत चालू ठेवा. यासाठी एक उत्तम उदाहरण मला आठवत आहे. जसे कि मंदिरात एक नंदादीप सतत आणि अखंड अगदी कमी पण पुरेश्या प्रकाशात (हा प्रकाश जास्ती प्रखरहि नसतो आणि जास्ती मिणमिणही नसतो पण तो एवढा नक्कीच असतो कि ज्यामुळे समोरची ईश्वराची मूर्ती आपल्याला स्पष्ट दिसते) तसाच एक हळुवार आवाजाचा संगीतमय नंदादीप आपण सतत तेवत ठेवला पाहिजे.
चला तर मग आपल्या आवडत्या संगीताचा अखंड नंदादीप आपण तेवत ठेऊया आणि या संगीत विश्वाचा भरभरून आनंद घेऊया. तसेच हे संगीत ज्यांनी ज्यांनी निर्माण केले आहे त्या सर्व परंपरागत महान व्यक्ती आणि विभूतींना कोटी कोटी धन्यवाद देऊया ज्यांच्यामुळे आज आपण हा संगीतरुपी खजिना मनमुराद लुटू शकतो. आपला दिवस सुरेल आणि संगीतमय जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना …!
संकल्पना आणि लेखन
ॲड. श्री. भगवान मिरजकर
संगीत उपासक, संगीत अभ्यासक
M.A., LL.B.
टेकनिकल रायटर & कन्टेन्ट रायटर